व्हिएतनाम — एक अविस्मरणीय सफर
*व्हिएतनाम — एक अविस्मरणीय सफर*
बारा दिवस, वीस प्रवासी, सहा शहरे, तीन व्हिलेजस — इतिहास, संस्कृती आणि नैसर्गिक सौंदर्याने भरलेला एक अनोखा अनुभव, जो आयुष्यभर विसरता येणार नाही असा अविस्मरणीय.....!!! - लिझर क्लब हॉलिडेस·
*२७ फेब्रुवारी – 10 मार्च २०२६*
४ ऑक्टोबरला गुरुजी हॉस्पिटल चे विश्वस्त आणि संस्कार भारतीचे महामंत्री श्री. रवी बेडेकर सर यांनी व्हिएतनामला जाण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावेळी हाती फक्त चार सीट्स होत्या. त्यांना कोटेशन दिले, टूर प्रोग्रॅम नीट समजावून सांगितला. शेवटी त्यांनी एक साधा प्रश्न विचारला — "तु येणार का?" माझे उत्तर स्पष्ट होते: किमान पंधरा सीट्स भरल्या तर येईन.
बेडेकर सरांनी ते आव्हान मनापासून स्वीकारले. १५ डिसेंबरपर्यंत तब्बल वीस सीट्सचे बुकिंग निश्चित झाले. उज्जैन, इंदोर, पुणे, मुंबई — मोठे व्यावसायिक, अभिनेते-अभिनेत्री, निवृत्त कर्नल, महामंत्री असे वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज एकत्र केले आणि बुकिंग फायनल केले . आता जबाबदारी मोठी होती — प्रत्येक गोष्ट उत्तम असायला हवी होती.
लिझर क्लब हॉलिडेसची संपूर्ण टीम कामाला लागली. व्हिएतनाम एअरलाईन्सची पॉश फ्लाइट बुक केली, सिक्स-स्टार डायना क्रूझ निश्चित केली आणि अकरा दिवसांचा भरगच्च कार्यक्रम तयार झाला.
*पहिला दिवस*
हो ची मिन्ह शहर — युद्धाचा इतिहास आणि खुणा
२७ फेब्रुवारी रात्री अकरा वाजून दहा मिनिटांनी मुंबईहून व्हिएतनाम एअरलाईन्सने उड्डाण केले. पहाटे पाच वाजून पन्नास मिनिटांनी हो ची मिन्ह शहरात लँडिंग झाले. स्थलांतर आणि सामान घेण्यासाठी साधारण एक तास लागला. विमानतळावरच फ्रेश होऊन, थेट कू ची टनेल्सकडे निघालो. दोन तासांच्या प्रवासानंतर आम्ही त्या ऐतिहासिक भूमीवर पोहोचलो.
कू ची टनेल्स म्हणजे व्हिएतनाम युद्धकाळातील एक भूमिगत शहर. एकूण २६० किलोमीटरचे भुयारांचे जाळे — अरुंद बोगदे, शस्त्रनिर्मिती केंद्रे, रुग्णालये, स्वयंपाकघर आणि सैनिकांचे गुप्त जीवन पाहताना प्रत्येकाला त्या काळातील संघर्ष आणि धैर्याची खोल जाणीव झाली. अमेरिकेने जवळपास सतरा वर्षे युद्ध केले, पण काँग आर्मीने गनिमी आणि गोरिला पद्धतीने लढत अखेर विजय मिळवला. ती जिद्द आणि चिकाटी, संघर्ष प्रत्येक भुयारात जाणवत होती.
त्यानंतर स्वातंत्र्य भवन पाहायला गेलो — व्हिएतनाम युद्धाचे आणि मोठमोठ्या निर्णयांचे हे मुख्य केंद्र. १९७३ मध्ये उत्तर आणि दक्षिण व्हिएतनामच्या पुनर्मिलनाचा ऐतिहासिक क्षण येथेच घडला होता. नंतर नोत्र दाम कॅथेड्रलमध्ये फ्रेंच वास्तुकलेची भव्यता अनुभवली. या इमारतीसाठी प्रत्येक साहित्य फ्रान्समधून आणले गेले होते — फ्रान्समधील कॅथेड्रल आणि येथील कॅथेड्रल जणू एकाच साच्यातून बनवलेले. ऐतिहासिक टपाल कार्यालय पाहून बनाना लीफ रेस्टॉरंटमध्ये चहाचा आनंद घेतला आणि त्यानंतर हॉटेलला परतलो.
हॉटेल इतक्या उत्तम ठिकाणी होते की समोरच अवघ्या पन्नास मीटरवर बेन थान मार्केट होते. संध्याकाळी बाजूच्या उद्यानात बसून शहराची रोषणाई, धावपळ आणि शांतता एकत्र अनुभवली, गप्पाटप्पा मारल्या — तो क्षण वेगळाच होता.
*दुसरा दिवस*
मेकाँग डेल्टा — ग्रामीण जीवनाचा खरा चेहरा बघितला
सकाळी नऊ वाजता हॉटेलवरून निघालो. दोन तासांच्या प्रवासानंतर मेकाँग डेल्टामध्ये पोहोचलो आणि एका वेगळ्याच विश्वात प्रवेश केला. नदीवरील बेटे, मधमाश्यांचे शेत, नारळाच्या गोळ्यांचे कारखाने, विषारी सापापासून बनविलेली वाइन आणि फळबागांमध्ये वाजणारे पारंपरिक संगीत — हे सारे ग्रामीण व्हिएतनामचे जिवंत रूप अनुभवले.
हिरव्यागार कालव्यांमधून बोटीने केलेला तो प्रवास आयुष्यभर लक्षात राहील. किनाऱ्यावरची घरे, शेते, माणसे — सगळे जवळून न्याहाळता आले. स्थानिक लोकांचे साधे पण समृद्ध जीवन जवळून अनुभवणे हे शब्दांत सांगणे खरोखरच कठीण आहे. संध्याकाळी परत बेन थान मार्केट मध्ये खरेदीचा आनंद घेतला.
*तिसरा व चौथा दिवस*
फु क्वोक बेट — अगदी स्वर्गाचा तुकडा असल्यासारखे वाटले
तिसऱ्या दिवशी सकाळी फु क्वोकसाठी विमान होते. उतरल्यावर टूर गाईड आना यांनी कंपनीचा लोगो छापलेल्या नारळाने स्वागत केले — ती कल्पना आणि तो आपुलकीचा स्पर्श सर्वांनाच मनापासून भावला.
दुपारचे जेवण करून लगेच वीण पर्ल सफारीला निघालो. तेथे अगदी आफ्रिकेतील केनियातील वन्यजीव सफारीचा भास झाला — असंख्य प्रमुख प्राणी अगदी जवळून पाहता आले. त्यानंतर ग्रँड वर्ल्डमध्ये युरोपियन शैलीतील वास्तुकला, व्हेनिसच्या गोंडोला राईडने आणि "क्विंटेसन्स ऑफ व्हिएतनाम" या सांस्कृतिक कार्यक्रमाने संध्याकाळ रंगतदार झाली. अगदी युरोपमध्येच फिरतो आहोत असे वाटत होते.
पुढच्या दिवशी पर्ल फॅक्टरी पाहून स्पीड बोटने मोंग ताय बेटावर पोहोचलो. चार बेटांचा वेगवान फेरफटका घेतला, स्नॉर्कलिंग आणि वॉटर पार्कमध्ये सर्वांनी मनसोक्त मजा केली. त्यानंतर जगातील सर्वात लांब समुद्रावरून जाणारी होन थॉम केबल कार — एकूण एकोणतीस मिनिटांचा प्रवास. खाली चमकते निळे समुद्र, फिशिंग व्हिलेज आणि आजूबाजूला हिरवीगार बेटे — मन मंत्रमुग्ध झाले. रात्रीचा "सिफोनी" कार्यक्रम हा प्रकाश, संगीत आणि व्हिएतनामी संस्कृतीचा अद्भुत संगम होता.
*पाचवा ते सातवा दिवस*
दा नांग आणि होई आन — आधुनिकता व परंपरेचा एक अनोखा मिलाफ आहे
दा नांगमध्ये सन त्रा द्वीपकल्पावरून शहराचे विहंगम दृश्य पाहिले. लिन्ह उंग पगोडामधील भव्य बुद्ध मूर्तीने मन भारावले. ड्रॅगन ब्रिज आणि लव्ह ब्रिज आधुनिक व्हिएतनामचा चेहरा बघितला. हान मार्केट मध्ये खरेदीचा आनंद घेतला आणि माय खे समुद्रकिनाऱ्यावर एक शांत संध्याकाळ घालवली.
सकाळी आमच्या गटातच एक खास कार्यक्रम घेतला — उत्तम भारतीय वेशभूषा स्पर्धा, परस्परांशी ओळख आणि गप्पागोष्टींचे मोकळे सत्र झाले. प्रत्येकाची यशाची व आयुष्याची झलक ऐकायला मिळाली. वीस जणांच्या या गटात किती वेगवेगळ्या पार्श्वभूमीचे लोक होते हे जाणून घेणे एक आगळावेगळा अनुभव होता. शाही मस्तानी चा उत्तम भारतीय वेशभूषा परिधान केलेल्या आणि विजेती अभिनेत्री , निवेदिका आणि लेखिका स्मिता आपटे याच्याशी मनमोकळ्या गप्पा मारता आल्या तसेच पेशवाई वेशभूषा परिधान केलेले श्री जयंत दामले काका एक बँक अधिकारी आणि एक उत्तम कलाकार आहे हे अनुभवयाला मिळाले , विजेत्यांना पैठणी व महाराष्ट्रीयन हॅण्डमेड बैलगाडी बक्षीस देण्यात आले .
नंतर कॅम थान गावात बांबूच्या टोपलीसारख्या गोल बोटीची सफर केली — आणि मग पोहोचलो होई आनमध्ये. लालटेन दिव्यांनी उजळलेले गल्लीबोळ, जपानी पूल, चिनी सभागृहे आणि प्राचीन घरे — जणू काळाचे चाक तेथे थांबले होते. ते जादुई गाव डोळ्यांत आणि मनात साठवत राहिलो.
दुसऱ्या दिवशी सकाळी बा ना हिल्स साठी प्रवास सुरु केला , वातावरण खूप ढगाळ आणि पाऊस मिळाला पण बा ना हिल्समधील सुवर्ण पूल आहे, व्हिएतनाम चा एक आयकॉनिक सिम्बॉल आहे — दोन विशाल दगडी हातांनी धरलेला तो पूल — हे संपूर्ण प्रवासातील सर्वोच्च आकर्षण ठरले. त्या पर्वतशिखरावरून दिसणारे दृश्य पाहताना प्रत्येकाला वाटले की आपण कुठल्या तरी स्वर्गीय ठिकाणी आलो आहोत अशी जाणीव झाली. तेथील ट्युलिप गार्डन तर अप्रतिम होते , बुद्धाची भली मोठी मूर्ती येथे बघायला मिळाली.
*आठवा व नववा दिवस*
हनोई आणि निन्ह बिन्ह — म्हणजे इतिहासाच्या पाऊलखुणा
हनोईमध्ये बा दिन्ह चौक, त्रान क्वोक पगोडा आणि होअन कियेम सरोवर पाहिले. पण सर्वात थक्क करणारा अनुभव होता ट्रेन स्ट्रीट — जेथे रेल्वे अगदी घरांच्या दाराजवळून वेगाने जाते, आणि तरीही स्थानिक लोक शांतपणे आपले रोजचे जीवन जगत असतात. हे दृश्य पाहून मन खरोखरच स्तब्ध झाले.
निन्ह बिन्हमध्ये होआ लू ही प्राचीन राजधानी आणि ताम कॉकमधील बांबू बोटीची सफर केली. हिरव्यागार डोंगरांच्या मधून नदीतून बोटीतून नदी, डोंगर आणि समुद्र , गुफा यांचे जीवन अनुभवणे म्हणजे मन भारावून टाकणारे होते — ताम कॉक ला "जमिनीवरचे हा लॉंग बे" म्हणतात आणि ते वर्णन अगदी खरे आहे. तो अनुभव शब्दांत पूर्णपणे मांडणे शक्य नाही कारण तो निसर्ग आणि सौंदर्य कल्पनेच्या पलीकडे आहे.
*दहावा व अकरावा दिवस*
हा लॉंग बे — सोनेरी समारोप
प्रवासाचा समारोप झाला हा लॉंग बेमध्ये — सिक्स-स्टार डायना क्रूझवर मुक्काम. कयाकिंग, स्वयंपाकाचे आणि पेंटिंग चे प्रात्यक्षिक आणि सूर्यास्ताच्या वेळी नृत्याचा आनंद — प्रत्येक क्षण विलासिता आणि उत्साहाने भरलेला होता. वातावरण ढगाळ असल्यामुळे समुद्रावरचा सूर्योदय आणि सूर्यास्त दिसला नाही, पण क्रूझवरील जेवण, सहवास आणि एकूण वातावरण यांनी ते क्षण मनात कायमचे कोरले गेले.
सकाळी समुद्रावरील तरंगते हॉटेल आणि मासेमारी शेती अनुभवायला मिळाले. तरंगत्या घरांमध्ये राहणारे लोक, त्यांचे मासेमारीचे जीवन जवळून पाहणे — हा अनुभव शब्दांत सांगता येणार नाही इतका वेगळा आणि सुंदर होता.
*थोडक्यात व्हिएतनाम — जे दिसले, जे जाणवले*
अकरा दिवसांच्या या प्रवासात व्हिएतनामने जे चित्र उभे केले ते मनावर कायमचे कोरले गेले. संपूर्ण प्रवासात एकही भिकारी दिसला नाही. हेल्मेटशिवाय दुचाकी चालवणारा — मागच्या आसनावरचाही — कोणी नाही. सिग्नल मोडणारे, झोपडपट्ट्या, रस्त्यावर कचरा, थुंकणे — यापैकी काहीही दिसले नाही. कुठेही मोठ्याने भांडणे, हॉर्न वाजवणारे, गोंधळ किंवा अतिक्रमण करून टाकलेली दुकाने नाहीत. बंदुका बाळगणारे पोलीस कुठेच नाहीत, कारण जागोजागी असलेले सीसीटीव्ही कॅमेरे स्वतःच शिस्त राखतात.
महिला सर्वत्र आणि प्रत्येक ठिकाणी दिसल्या — रेस्टॉरंटमध्ये, दुकानांत, फुटपाथवर छोटा व्यवसाय करताना. समाजात, व्यवसायात , नोकरीत महिलांचा सक्रिय सहभाग आणि त्यांची कष्टाळू वृत्ती खूपच प्रभावित करते. शेती अत्यंत समृद्ध आहे — वर्षात तीन वेळा भाताचे पीक घेतले जाते. रोपवाटिकेत आठ-दहा वर्षांची मोठी झाडे तयार करून नंतर त्यांचे दुसऱ्या ठिकाणी रोपण केले जाते — हे पाहून आश्चर्य वाटले.
बांबू आणि नारळापासून शेकडो उत्पादने तयार होतात. बांबूचे कापड कापसापेक्षा अधिक टिकाऊ आणि मऊ असते हे तिथे प्रत्यक्ष दाखवले गेले. तांदूळ निर्यातीत भारत पहिल्या क्रमांकावर तर व्हिएतनाम दुसऱ्या — हे त्यांनीच अभिमानाने सांगितले. मसाल्यांचा वापर तेथे अत्यंत कमी आहे, साखर आणि दूधही फारसे वापरत नाहीत. कोरा चहा किंवा कॉफी असेच घेतात ते लोक.
बुद्ध मंदिरे सर्वत्र आहेत. प्रत्येक दुकानाच्या दारापाशी एक छोटे देवघर असते, त्यावर नैवेद्य मांडलेला असतो — पण चपला काढण्याची पद्धत नाही. तेरा हा अंक अशुभ मानतात. स्थानिक लोक अत्यंत प्रेमळ आणि मनमिळावू आहेत. भारताविषयी त्यांना विशेष आदर आणि जिव्हाळा आहे. फ्रान्स, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, तैवान, जपान, चीन — अनेक देशांचे पर्यटक भेटले, पण महाराष्ट्रीयन, गुजराती, तमिळ, आसामी असे भारतीयही भरपूर होते. स्वादिष्ट आणि रुचकर भारतीय जेवण मिळाले , कोऱ्या करकरीत वोल्वो बस ने प्रवासाचा मस्त आनंद घेतला.
रस्त्यावर कुत्रे नाहीत, इतर जनावरे नाहीत, ट्रॅक्टर शेतात कधी दिसला नाही. छोट्या दुकानदाराजवळही आयफोन असतो. चारचाकी वाहने महाग असल्याने दुचाकीच जास्त — पण दुचाकीवरून लोक एखाद्या मिनी ट्रकसारखे सामान वाहतात. झाडे सुंदर वाढवलेली, बागा नीटनेटक्या, सगळीकडे स्वच्छता — व्हिएतनाम हे एक शिस्तबद्ध, सुखी आणि आत्मविश्वासू राष्ट्र आहे हे जाणवले.
"हा प्रवास केवळ पर्यटन नव्हता, तर व्हिएतनामच्या आत्म्याशी जोडणारा एक खोल अनुभव होता. इतिहास, संस्कृती, नैसर्गिक सौंदर्य आणि तेथील माणसांचे जीवन — हे सर्व आपण जवळून पाहिले, जगले. लिझर क्लब हॉलिडेस मार्फत केलेला हा प्रवास कायमचा आठवणीत राहील." ह्या सर्व प्रवासाचे श्रेय *गुरुजी हॉस्पिटल चे विश्वस्त आणि संस्कार भारतीचे महामंत्री श्री. रवी बेडेकर सर* यांना जाते कारण त्यांची मेहनत, त्यांचा माझ्यावरील विश्वास , तुमचा त्यांच्यावरील विश्वास... खरोखर बेडेकर सर म्हणजे एक अनोखे व्यक्तिमत्व ..!!
*— संतोष शिरसाठ*
*लिझर क्लब हॉलिडेस, नाशिक*